जेपी नड्डांच्या घरी बोलावून मोबाईल जप्त, 'हाऊस अरेस्ट' केल्याचा आरोप; जंतरमंतरवरील गोंधळामागे सरकारचा डाव?

जेपी नड्डांच्या घरी बोलावून मोबाईल जप्त, 'हाऊस अरेस्ट' केल्याचा आरोप; जंतरमंतरवरील गोंधळामागे सरकारचा डाव?

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलनाचे प्रमुख चेहरे अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार, भाजप आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. चर्चेच्या नावाखाली आंदोलनातील प्रमुख सदस्य आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले. तिथे त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले आणि जवळपास पाच तास बाहेर जाऊ दिले नाही, असा दावा दिपके यांनी केला. या सर्वामागे आंदोलनाचे नेतृत्व कमकुवत करून जंतरमंतरवर गोंधळ निर्माण करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दिपके यांच्या म्हणण्यानुसार, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी, महिला आणि अल्पवयीन मुलींवरही लाठीमार केला. या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाल्याचा दावा त्यांनी करत, पोलिसांनी मुद्दाम चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला. काही आंदोलकांवर अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून, या संपूर्ण घटनेची जबाबदारी केंद्र सरकारवर असल्याचेही त्यांनी म्हटले.

याशिवाय, आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी काही संशयित व्यक्तींना सिव्हिल ड्रेसमध्ये आणण्यात आले, त्यांना पोलिसांकडून मदत करण्यात आली आणि अधिकाऱ्यांना नेमप्लेट काढून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावाही दिपके यांनी केला. आंदोलनस्थळी दगडांनी भरलेले ट्रक कसे पोहोचले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

दिपके यांनी पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्याबाबतही मोठा दावा केला. आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीमारानंतरच वांगचुक यांनी पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असूनही त्यांनी आंदोलनाला पाठिंबा कायम ठेवला, असेही दिपके म्हणाले.

आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतरमंतरवर येऊनच चर्चा करावी, आम्ही कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका अभिजीत दिपके यांनी मांडली. दरम्यान, या सर्व आरोपांवर सरकार किंवा दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे दिपके यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही.