‘मुळशी पॅटर्न’ फेम ओम भूतकरचा गुपचूप विवाह; जाणून घ्या कोण आहे ती?

‘मुळशी पॅटर्न’ फेम ओम भूतकरचा गुपचूप विवाह; जाणून घ्या कोण आहे ती?

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता ओम भूतकर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ओमने नुकताच लग्नगाठ बांधली असून, त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहते आणि नेटकऱ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. अभिनेत्याने लग्न केल्याची माहिती अचानक समोर आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

ओम भूतकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्या पत्नीची. ओमने नेमकं कोणाशी लग्न केलं, त्याची पत्नी कोण आहे, याबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते. दरम्यान, अभिनेत्री पर्ण पेठे हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ओमच्या लग्नातील काही खास फोटो शेअर करत त्याच्या पत्नीच्या नावाचा खुलासा केला आहे.

ओम भूतकरच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री पर्ण पेठे देखील या खास सोहळ्याला उपस्थित होती. तिने ओमच्या लग्नातील आणि रिसेप्शनमधील काही सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ओम त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे.

लग्नाच्या खास दिवशी ओम भूतकरने पारंपरिक लूक केला होता. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता आणि डोक्यावर फेटा बांधला होता. त्याची पत्नी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. दोघांनीही पारंपरिक पोशाखात लग्नसोहळ्याची शोभा वाढवली होती.

ओमच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी गुजराती पद्धतीने नेसली होती. हातातील लाल रंगाच्या बांगड्यांमुळे तिचा पारंपरिक लूक आणखी खुलून दिसत होता. पर्ण पेठेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ओम आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा देताना दोघांना टॅग केले आहे. याच पोस्टमधून ओमच्या पत्नीचे नाव प्रेरणा सेठिया असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रेरणा सेठिया यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, त्या Wildlife Conservationist म्हणून कार्यरत आहेत. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात त्या काम करत असल्याची माहिती मिळते. त्या Freeland Global या संस्थेशी जोडलेल्या असून, निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणासाठी योगदान देत आहेत.

दरम्यान, ओम भूतकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधील त्याच्या भूमिकेने त्याला विशेष ओळख मिळाली. याशिवाय ‘देऊळ बंद 2’ आणि ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या आगामी चित्रपटांमुळेही तो चर्चेत आहे. अभिनयासोबतच आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वामुळेही तो चर्चेचा विषय ठरला आहे.