दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे श्वसनास त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा आणि अंदाज बांधले जात होते. मात्र, या सर्व तर्क - वितर्कांना पूर्णविराम देत धर्मेंद्र यांना अखेर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदन जारी करत या बाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, श्री धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली असून आता घरी त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. आम्ही माध्यमे आणि जनतेला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या बातम्या प्रसारित करू नयेत आणि त्यांच्या तसेच कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. ते सर्वांना खूप प्रेम करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना आज सकाळी साडेसात वाजता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचार आता त्यांच्या निवासस्थानीच केले जाणार आहेत. धर्मेंद्र यांना 10 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत आणि निधनाबाबत अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, अभिनेत्री ईशा देओल आणि हेमामालिनी यांनी सोशल मीडियावर या बातम्यांचे खंडन करत स्पष्ट केले की धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत जनतेने चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.




