'या' नगरपरिषदेत महायुतीत फूट ! भाजपाचा ‘एकला चलो रे’ नारा
खेड - खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वरच्या पातळीवर ‘महायुती’ चा निर्णय झालेला असला, तरी स्थानिक राजकारण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि नेतृत्वावरून तीव्र मतभेद उफाळून आले आहेत.

भाजपाने ‘एकला चलो रे’ चा नारा देत स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतल्याने खेडमधील महायुतीचा फॉर्म्युला कोलमडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट)नेही निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली असून नगराध्यक्ष पदासह एकूण २० नगरसेवक पदांचे उमेदवार निश्चित केले आहेत. माजी मंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.
भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी वैभवी खेडेकर यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. अलीकडील बैठकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका स्पष्ट करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून जोरदार टीका केली. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्येही नाराजीचे सूर उमटले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जागावाटपाच्या प्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला आहे. ही नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचली असून, त्यांनी स्थानिक स्तरावर "विनधास्त लढा" असा सल्ला दिल्याचे सूत्रांकडून समजते.
महायुतीत तणाव वाढत असतानाच, विरोधी गटांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे खेड नगरपरिषद निवडणूक बहुकोनी आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे.




