महापालिका निवडणूक लढवणार नाही ;कृष्णराज महाडिक यांचा खुलासा

महापालिका निवडणूक लढवणार नाही ;कृष्णराज महाडिक यांचा खुलासा

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत असल्याचे प्रतिपादन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केले. 

कृष्णराज महाडिक पुढे म्हणाले, महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.