फडणवीसांच्या खुर्चीवर प्रश्नचिन्ह? एकनाथ शिंदेंच्या हालचालींनी चर्चांना उधाण; संजय राऊतांचा मोठा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा माजी मंत्री तानाजी सावंत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षातील लोकांना भेट दिली जात नाही, मात्र पक्षांतर करणाऱ्यांना तातडीने वेळ दिला जातो, असा आरोप त्यांनी केला. तसेच "ऑपरेशन देवेंद्र" सुरू झाल्याचा दावा करत, फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील की नाही, अशी चर्चा आता सुरू झाल्याचेही त्यांनी म्हटले.
याशिवाय, पक्षांतर केलेल्या खासदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणीही राऊत यांनी केली. पक्षांतर करणाऱ्यांना सरकारकडून निधी आणि महत्त्व दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर संविधानविरोधी भूमिका घेतल्याचाही आरोप केला.संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात या घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




