भाजपा कडून जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूकीची तयारी ; इच्छुकांच्या मुलाखती सुरू

भाजपा कडून जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूकीची तयारी ; इच्छुकांच्या मुलाखती सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिका निवडणूकीची प्रक्रिया ऐनभरात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होवू शकते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू  झाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी, पक्षाकडे ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने, राज्य निवडणूक आयोगाची धावपळ उडाली आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणूकांची प्रक्रिया १६ जानेवारी रोजी मतमोजणीने पूर्ण होईल. दुसरीकडे पुढील दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या आहेत. 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातर्ंगत येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती ३ दिवस चालणार आहेत. आज कागल, राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. संपूर्ण जिल्हयातून ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर, त्याबद्दलचा अहवाल राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात येईल आणि उमेदवारीचा अंतिम निर्णय होईल, असेही खा. महाडिक यांनी सांगितले. बुधवारी कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, गगनबावडा तर गुरूवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. खा.  धनंजय महाडिक, आ.  अमल महाडिक यांच्यासह माजी आ. संजयबाबा घाटगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेत आहेत.