‘रुबाब’ ची अनोखी मेकिंग स्टोरी ; कलाकारांनी स्क्रिप्टशिवाय केला अभिनय
मुंबई - झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही चित्रपटाची टॅगलाईन प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडी आणि दमदार ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, आता हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

‘रुबाब’ च्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे. या चित्रपटासाठी कलाकारांना चक्क स्क्रिप्ट देण्यात आली नव्हती. ट्रेलरमध्ये कथानकाची झलक आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय दिसून येतो, पण या अभिनयामागची प्रक्रिया तितकीच वेगळी आहे. कलाकारांनी २३ दिवस विविध लोकेशन्सवर वर्कशॉप्स आणि रिहर्सल्स करत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले, मात्र स्क्रिप्ट असूनही ती कलाकारांना देण्यात आली नाही.
यामागचे कारण दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांची खास कार्यपद्धती आहे. त्यांनी प्रत्येक प्रसंग, संवाद आणि भावनिक पट कलाकारांना सविस्तरपणे समजावून सांगितला. त्यामुळे कलाकारांनी लिखित स्क्रिप्टपेक्षा प्रत्यक्ष अनुभव, समज आणि संवादातून प्रसंग साकारले. या प्रक्रियेमुळे सेटवर सातत्याने चर्चा, संवाद आणि सर्जनशील देवाणघेवाण सुरू होती. परिणामी, ‘रुबाब’ मध्ये अभिनयाची एक नवी आणि वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




