‘धुरंधर २’ मध्ये विकी कौशलची दमदार एन्ट्री ; मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेत झळकणार
मुंबई - सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘धुरंधर’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवली असून, त्यानंतर आता निर्माते ‘धुरंधर २’ च्या तयारीला लागले आहेत. रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांच्याभोवती फिरणाऱ्या या फ्रँचायझीचा दुसरा भाग वेगाने आकार घेत आहे. दिग्दर्शक आदित्य धर सध्या ‘धुरंधर २’ च्या ट्रेलरवर लक्ष केंद्रित करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा टीझर सनी देओलच्या आगामी ‘बॉर्डर २’ सोबत प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच ‘धुरंधर २’ बाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल ‘धुरंधर २’ च्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विकी कौशल या चित्रपटात एक विस्तारित कॅमिओ साकारणार असून, तो मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेत दिसणार आहे. हा भाग २०१६ च्या पार्श्वभूमीवर आधारित असून, विकी कौशलची एंट्री प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

विकी कौशल आणि रणवीर सिंग यांचा थेट सामना चित्रपटात पाहायला मिळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, दुसऱ्या भागात अक्षय खन्ना केवळ फ्लॅशबॅक दृश्यांमध्ये दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे. ‘धुरंधर २’ च्या प्रदर्शनाला अजून काही कालावधी शिल्लक असला तरी, प्रेक्षकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पुन्हा एकदा मोठी कमाल करेल, याची निर्मात्यांना खात्री असल्याने कथानक अत्यंत गुप्त ठेवण्यात आले आहे. तरीही, अधूनमधून कथेबाबतच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
कलाकारांच्या फळीत रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांच्यासह सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या भागाने आतापर्यंत सुमारे १.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता सर्वांच्या नजरा ‘धुरंधर २’कडे लागल्या असून, हा चित्रपट यशच्या ‘टॉक्सिक’शी बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धा करणार आहे.




