शिवसेना अन् राष्ट्रवादी नेमकी कुणाची..? कुणाकडे जाणार पक्षाचे चिन्ह अन् नाव..? आज होणार सुनावणी

शिवसेना अन् राष्ट्रवादी नेमकी कुणाची..? कुणाकडे जाणार पक्षाचे चिन्ह अन् नाव..?  आज होणार सुनावणी

मुंबई - शिवसेनेचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह आणि पक्षाचं नाव कुणाच्या बाजूने जाणार, याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून सुरू असलेला वाद दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. आजपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. सरोदे म्हणाले की, मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मूळ शिवसेनेच्या प्रकरणाची सुनावणी आज सुरू होईल, असे स्पष्ट केले होते. तसेच कोणाला किती वेळ युक्तिवादासाठी दिला जाईल, हेही ठरवण्यात आले होते.

आज सकाळी 11.30 वाजता जर मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू झाली, तर किमान सुरुवात होऊन पुढील सुनावणी उद्यावर ढकलली जाण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आपसातच मिटवण्याचे संकेत त्यांच्या हालचालींवरून दिसत असले, तरी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेईपर्यंत हे प्रकरण न्यायालयाच्या यादीवर राहणारच, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारच्या वतीने अरावली पर्वतरांगांबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर दुपारी एक वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंतच सरन्यायाधीश सूर्यकांत त्यांच्या नियमित खंडपीठाचे कामकाज पाहतील. त्यानंतर सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या विशेष खंडपीठासमोर पर्यावरणाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी होणार आहे.

या परिस्थितीमुळे ‘शिवसेना सत्तासंघर्ष, पक्ष फोड आणि धनुष्यबाण चिन्ह’ या मुद्द्यांवरील सुनावणी आज होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनाव व चिन्हावरील वादाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार असल्याने, आज सर्वोच्च न्यायालयात नेमकी काय घडामोड होते आणि कोणती दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.