निवृत्तीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश गवई यांनी केलं मोठं विधान

निवृत्तीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश गवई यांनी केलं मोठं विधान

CJI Bhushan Gavai - निवृत्तीपूर्वीच्या निरोप समारंभात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आपल्या श्रद्धा, मूल्ये आणि प्रवासाबद्दल अत्यंत आत्मीयतेने विचार मांडले. सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन आयोजित कार्यक्रमात त्यांनी न्यायमूर्ती, वकील आणि उपस्थित मान्यवरांसमोर मनाला भिडणारे विचार व्यक्त केले. CJI गवई म्हणाले, मी बौद्ध धर्माचे पालन करतो; पण कोणत्याही धर्माचे सखोल धार्मिक ज्ञान माझ्याकडे नाही. मी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे आणि हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख सर्व धर्मांबद्दल माझी समान भावनाच आहे.

CJI गवई पुढे म्हणाले, बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा उल्लेख केला. माझे वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते. त्यांच्यासोबत राजकीय सभांना गेल्यावर आम्ही दर्गे, गुरुद्वारे, विविध धार्मिक स्थळांना भेट देत असू. सर्वधर्मसमभावाची ही भावना त्यांनी आमच्यात रुजवली, असे त्यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते भावुक झाले. महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारा एक दलित मुलगा कधी सरन्यायाधीश होईल, असे कोणाला वाटले होते? हे शक्य झाले ते संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूलभूत तत्त्वांमुळे. मी आयुष्यभर या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न केला,” असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाबाबत बोलताना त्यांनी संस्थेच्या सामूहिक स्वरूपावर भर दिला. हे न्यायालय एखाद्या व्यक्तीचे नसून सर्व न्यायमूर्ती, वकील, रजिस्ट्री आणि कर्मचाऱ्यांचे आहे. बार असोसिएशन आणि SCAORA यांच्याशी सतत संवाद ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी CJI गवईंच्या मानवी दृष्टिकोनाची प्रशंसा केली. सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी त्यांचे समर्पण विलक्षण आहे. ते अत्यंत नम्र, सौहार्दपूर्ण आणि उत्तम यजमान आहेत. निवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील, असे त्यांनी म्हटले.

SCAORA चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विपिन नायर यांनीही त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. विशेषतः तपास यंत्रणांकडून वकिलांना चौकशीसाठी बोलावण्याच्या प्रकरणात न्यायालयाने घेतलेल्या ठोस भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे CJI गवई यांचा शुक्रवार हा सुप्रीम कोर्टातील शेवटचा कामकाजाचा दिवस ठरला. त्यांच्या निरोपामुळे संपूर्ण न्यायालयात भावनिक वातावरण निर्माण झाले.