रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट ‘आशा’ चा दमदार टीझर प्रदर्शित
मुंबई - ‘सैराट’ मधील प्रभावी कामगिरीनंतर रिंकू राजगुरुने प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली. आता तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिंकूच्या आगामी मराठी चित्रपट ‘आशा’ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या टीझरमध्ये रिंकूचा पूर्णपणे नवा आणि प्रभावी अवतार दिसून येतो.

‘आशा’ मध्ये एका साध्या मुलीची संघर्षमय वाटचाल दाखवण्यात आली आहे. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांमुळे आयुष्याची दिशा कशी बदलते याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. कधी निरागस, तर कधी गंभीर रिंकूच्या अभिनयातील विविध छटा प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. “बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” ही टॅगलाईन चित्रपटाचा टोन स्पष्ट करते.
https://www.instagram.com/p/DQbGJtrjD5o/?utm_source=ig_web_copy_link
चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून रिलीजपूर्वीच ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार जिंकून चित्रपटाने भरघोस यशाची नांदी वाजवली आहे.
सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात पाहायला मिळतील. रिंकू ‘आशा’ ची भूमिका साकारत असून ती केवळ आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक स्त्रीसाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज म्हणून उभी राहते. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांना न घाबरता पुढे जाणारी तिची जिद्द मनाला भिडते.
‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा सेविकांचाच नाही, तर घर सांभाळत घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक बाईची कहाणी सांगतो. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील हे निर्माते असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली चित्रपट प्रदर्शित होणार आहे.




