कागल मतदारसंघात मुश्रीफ - मंडलिक आमनेसामने ; आरोप - प्रत्यारोपांचा जोरदार सिलसिला
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूरच्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप - प्रत्यारोपांचा जोरदार सिलसिला सुरू झाला आहे. एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे कागलचं राजकारण तापत चाललं आहे.

शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे आणि मंत्री मुश्रीफ यांच्या युतीवर टीका करताना संजय मंडलिक म्हणाले की, एका नेत्याला गैबी चौकातील वाड्यावरील आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे, तर दुसऱ्याला ईडीच्या चौकशीतून सुटका हवी आहे. म्हणूनच हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यांच्या युतीत कागलच्या विकासाचा किंवा जनतेच्या हिताचा कोणताही विषय नाही; फक्त वैयक्तिक स्वार्थ आहे.
मंडलिक पुढे म्हणाले की, विरोधकांच्या युतीमुळे स्वतः चा गट एकाकी पडल्याची चर्चा होत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत दिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता, त्याचप्रमाणे कागलमध्ये पुन्हा इतिहास घडेल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मंडलिक यांच्या टीकेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने समरजितसिंह घाटगे आणि माझ्यात युती झाली आहे. आमचा अजेंडा फक्त कागलचा विकास आहे. त्यांनी संजय मंडलिक यांना टीका करताना जपून बोलण्याचा सल्ला दिला. दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्याशी स्वतः ची तुलना करणे संजय मंडलिक यांना शोभणारे नाही. तसेच ईडी चौकशीसंदर्भात कोर्टातून स्वतः ची मुक्तता झाल्याचा उल्लेख करत त्यांनी मंडलिक यांचे आरोप फेटाळून लावले. जमीनीवरील आरक्षणासाठी युती केल्याचा आरोपही त्यांनी निराधार असल्याचे सांगितले.
आत्ता मंडलिक आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात आरोप - प्रत्यारोपांचा सिलसिला असाच सुरू राहणार का..? की कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




