बिहार निवडणूक निकालात कोणाची आघाडी..?

बिहार निवडणूक निकालात कोणाची आघाडी..?

बिहार निवडणूक निकाल - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा आज होत असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेऱ्यांनुसार एनडीएने मोठी आघाडी घेतली असून भाजप ८७ आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयू ७९ जागांवर पुढे आहे. महागठबंधनला मोठा धक्का बसला असून त्यांना ५० जागांचा टप्पा गाठणेदेखील कठीण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बिहारमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांनी दोन सभा घेतल्या होत्या. बेगुसरायचे उमेदवार कुंदन कुमार यांच्या रोड शोमध्येही ते सहभागी झाले होते आणि मतदारांना मोठ्या बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन केले होते.

मात्र, बेगुसराय मतदारसंघातील मतमोजणीच्या सात फेऱ्यांनंतर परिस्थिती वेगळी दिसत आहे. येथे भाजपचे कुंदन कुमार २,३५७ मतांनी मागे आहेत, तर काँग्रेसच्या अमिता भूषण २९,१९९ मतांसह आघाडीवर आहेत. २००० ते २०१५ दरम्यान हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. २०१५ मध्ये अमिता भूषण यांनी विजय मिळवला, तर २०२० मध्ये कुंदन कुमार यांनी भाजपला परत विजय मिळवून दिला. आता पुन्हा दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

पाटणा साहिब मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली होती. इथून भाजपचे रत्नेश कुशवाह मैदानात आहेत. नामांकन दाखल करताना त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते आणि त्यावेळी फडणवीस त्यांच्यासोबत होते. सध्या रत्नेश कुशवाह १२,६९३ मतांनी आघाडीवर असून काँग्रेसचे शशांत शेखर दुसऱ्या स्थानावर आहेत. मतमोजणीच्या १४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.