Firing AT LOC : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा कुपवाडामध्ये गोळीबार; सीमेवरील तणाव वाढला

श्रीनगर: दहशतवादाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र भारताच्या या निर्णायक कारवाईनंतरही पाकिस्तानने अद्याप कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. उलट पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) सातत्याने गोळीबार सुरूच आहे. या गोळीबारात आतापर्यंत १२ हून अधिक भारतीय नागरिकांना प्राण गमवावे लागले असून अनेक जण जखमी झाले आहेत.
गुरुवारी (८ मे) रात्री पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार झाला. कर्नाह भागातील नागरिक वस्तीला लक्ष्य करत पाकिस्तानी सैन्याने तोफगोळे आणि मोर्टार डागले, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. गोळीबार सुरू होताच भारतीय सैन्याने त्वरित प्रत्युत्तर दिले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
याआधी पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय जवानाचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले असून कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह भागातही जोरदार कारवाई केली.