टायर फुटलं अन् नियंत्रण सुटलेली क्रूझर थेट दुसऱ्या लेनवर,थरारक अपघाताचे फोटो समोर
बारामती (प्रतिनिधी) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला.इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात क्रूझर गाडी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.टायर फुटल्याने नियंत्रण सुटलेली क्रूझर गाडी थेट दुसऱ्या लेनवर गेल्याने हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.एक क्रूझर गाडी कामगारांना घेऊन जात असताना लोणी देवकर एमआयडीसीच्या हद्दीत अचानक गाडीचा टायर फुटला.टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ही गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेकडून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली.
दोन्ही गाड्यांची समोरासमोर झालेली धडक इतकी जोरदार होती की, क्रूझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.या भीषण धडकेत गाडीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




