"फक्त राजीनामा नको, संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल!" जंतर-मंतरवर पोहोचून उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

"फक्त राजीनामा नको, संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल!" जंतर-मंतरवर पोहोचून उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली: आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा दिल्लीतील जंतर-मंतर येथे भेट देऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. "केवळ शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलणे गरजेचे आहे," असा घणाघात त्यांनी या वेळी केला.

"तरुणांच्या भविष्यावरच लाठीचार्ज"
जंतर-मंतरवरील मंचावरून विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर आलेल्या या सरकारने देशाच्या भविष्यावरच लाठीचार्ज केला आहे. अभिजीत दीपके या महाराष्ट्राच्या तरुणाने अन्यायाविरुद्ध ही ठिणगी पेटवली आहे आणि ती आता विझणार नाही. तरुणांनी स्वातंत्र्याचा लढा दिला होता, त्यांना जर कोणी दहशतवादी किंवा कॉक्रोच म्हणत असेल तर ते निषेधार्ह आहे."

"येणारा काळ तरुणांचाच!"
केंद्र सरकारला इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आज जे खुर्चीवर बसले आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की येणारा काळ या तरुणांचा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अन्यायाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. आता या आंदोलनाचा वणवा देशभर पेटला पाहिजे आणि या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."

उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढताना सांगितले की, "धर्मेंद्र प्रधान यांच्या केवळ राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही, संपूर्ण यंत्रणा आणि व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. सरकार तरुणांच्या आवाजाला घाबरले असून गुंडगिरीच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे." महाराष्ट्राचा तरुण या आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.