शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी १२ नोव्हेंबरला

शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी १२ नोव्हेंबरला

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला "शिवसेना" हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते. या निर्णयाला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने १२ नोव्हेंबर २०२५ पासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह लवकर ठरावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली.

या प्रकरणात दोन वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन लढाई सुरू असून, ठाकरे गटाने जुलै २०२५ मध्ये एक अंतरिम अर्ज दाखल केला होता. त्यात स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर "शिवसेना" नाव आणि "धनुष्यबाण" चिन्ह शिंदे गटासाठी गोठवण्याची मागणी करण्यात आली होती. या अर्जावर ऑगस्टमध्ये सुनावणी अपेक्षित होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती.

मागील सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाचा निर्णय लवकरच दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. आता अंतिम सुनावणीसाठी १२ नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.