मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी दिला ‘राजमंत्र’; आखली खास रणनिती
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना निवडणुकीचा ‘राजमंत्र’ देत मुंबई ताब्यात घेण्याचा संकल्प व्यक्त केला. “मुंबई वाचली पाहिजे, संकट ओळखा आणि एकजुटीने लढा,” असे आवाहन त्यांनी केले. याचवेळी मनसेकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यासाठी खास रणनिती आखण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मेळाव्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ही निवडणूक मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे, असा संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. सीट शेअरिंगमध्ये काही जागा येतात, काही जातात; त्यामुळे काहींना नाराजी वाटणे स्वाभाविक आहे. मात्र गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच आपण युतीमध्ये निवडणूक लढवत आहोत, त्यामुळे युतीचा धर्म पाळणे आवश्यक आहे. प्रत्येक जागा ही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची असून ही “रात्र वैऱ्याची” आहे, असे सांगत सर्वस्व झोकून देऊन मुंबई वाचवण्याचा संदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनसेकडून अद्याप एबी फॉर्मचे वाटप झाले नव्हते. आजपासून एबी फॉर्म वाटप सुरू होईल. आज उमेदवारांची यादी राज ठाकरे यांच्यासमोर सादर केली जाईल, त्यानंतर राजगड कार्यालयातून नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत एबी फॉर्मचे वितरण करतील. एबी फॉर्म मिळाल्यानंतरच जागांची संख्या स्पष्ट होईल,असेही त्यांनी सांगितले. शेवटपर्यंत किती जागांवर लढायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची, हे गुलदस्त्यात ठेवण्याची रणनिती मनसेने अवलंबली असल्याचेही त्यांनी नमूद केले.




