गायक जुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशात शोककळा

गायक जुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशात शोककळा

मुंबई - ईशान्य भारतातील आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 52 वर्षीय जुबिन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अपघाती मृत्यू झाला. ते नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरमध्ये आले होते, मात्र कार्यक्रमाला वेळ असल्याने त्यांनी स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, डायव्हिंगदरम्यान त्यांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. अपघातानंतर सिंगापूर पोलिसांनी त्यांना तात्काळ समुद्रातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संगीत क्षेत्रात शोकाची लाट उसळली असून त्यांच्या चाहत्यांमध्येही मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे प्रमुख श्यामकानू महंता यांनी स्पष्ट केले की, जुबिन गर्ग हा दौरा केवळ कार्यक्रमासाठी नव्हता, तर काही काळ सहकाऱ्यांसोबत सिंगापूरमध्ये फिरण्यासाठी त्यांनी स्वतःहून हा प्लॅन केला होता. फेस्टिव्हलमध्ये केवळ काही गाणी सादर करणे आणि चाहत्यांशी संवाद साधणे एवढाच त्यांचा हेतू होता. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्युझिकल टीम बरोबर नेलेली नव्हती.

त्यांच्यासोबत फक्त चुलत भाऊ संदीपन गर्ग, मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी होते. महंता यांनी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांना फेटाळून लावत स्पष्ट केले की, यॉट ट्रिपबाबत आयोजकांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. अपघाताची माहिती मिळताच सर्वजण थेट रुग्णालयात गेले.

जुबिन गर्ग यांचे खरे नाव जीवन बर्थकूर होते. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी आसाममधील जोरहाट येथे झाला. 2006 मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ गाण्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी आसामी, बंगाली, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये 40,000 पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड केली होती. ते ईशान्य भारताच्या सांस्कृतिक ओळखीचे मोठे प्रतिनिधी मानले जात होते.