लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना अटक
श्रीनगर – पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. लडाख पोलिसांच्या पथकानं डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. सध्या वांगचुक यांना तुरुंगात ठेवायचं की दुसरी कोणती व्यवस्था करायची, यावर निर्णय प्रक्रियेत आहे.

वांगचुक यांच्या अटकेनंतर लेहमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून ब्रॉडबँडचा वेगही कमी करण्यात आला आहे. २४ सप्टेंबरला लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सरकारनं वांगचुक यांना जबाबदार धरलं आहे. सरकारचा आरोप आहे की, वांगचुक यांच्या चिथावणीमुळे आंदोलनाला हिंसक वळण मिळालं.
लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी सातत्याने आंदोलन केलं असून, त्यांनी यासाठी आमरण उपोषणही सुरू केलं होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी आंदोलनात हिंसा भडकली आणि त्यात ४ जणांचा मृत्यू, तर ९० जण जखमी झाले. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषण थांबवत शांततेचं आवाहन केलं.
हिंसाचारानंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला असून, पोलीस व निमलष्करी दलांनी कडक अंमलबजावणी केली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक अटक, तसेच लेह जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि अंगणवाडी केंद्रं दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लेह, कारगिल आणि अन्य भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, ही हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.




