‘सालबर्डी’ गावाचं भयावह रहस्य 'या' दिवशी उलघडणार

‘सालबर्डी’ गावाचं भयावह रहस्य 'या' दिवशी उलघडणार

मुंबई - इतिहासाच्या गर्भात दडलेली अनेक रहस्ये काळाच्या ओघात अनुत्तरितच राहतात. काही रहस्यांचा शोध घेतला असता त्यातून आणखी गूढ प्रश्न निर्माण होतात. अशाच एका भयावह आणि रहस्यमय कथेवर आधारित ‘सालबर्डी’ हा थरारपट येत्या एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ या गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा मागोवा घेणारी ही कथा प्रेक्षकांना भय आणि थराराचा अनुभव देणार आहे.

नेब्यूला फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘सालबर्डी’ चित्रपटाचे निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव आहेत. रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून चित्रपटाच्या विषयातील भीषणता आणि गूढता प्रकर्षाने जाणवते. सालबर्डी गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासातून उघड होणारं काळं वास्तव, हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

भय आणि भ्रमाच्या विळख्यात अडकलेल्या घटनांमागचं सत्य नेमकं काय? ते सत्य कोण आणि कशा पद्धतीने बाहेर आणणार? या प्रश्नांची उत्तरं शोधताना प्रेक्षकांना जबरदस्त थराराचा अनुभव मिळणार आहे. भीती, थरार तसेच विश्वास-अविश्वासाच्या सीमारेषेवर नेणारा ‘सालबर्डी’ चित्रपट मराठीतील दमदार कलाकारांच्या सहभागामुळे अधिक प्रभावी ठरणार आहे. मात्र कलाकारांची नावे सध्या गुप्त ठेवण्यात आली असून यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांनी केले आहे. पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले असून कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे तर कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांनी सांभाळले आहे.