'या' लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार बिबट्याची दहशत

'या' लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार बिबट्याची दहशत

मुंबई - महाराष्ट्रात अलीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या भीतीमुळे राज्यभर चिंता व्यक्त होत असताना आता हाच संवेदनशील मुद्दा मालिकेतूनही मांडला जाणार आहे. सामाजिक जाणिवांना नेहमीच प्राधान्य देणाऱ्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका बिबट्यांची वाढती दहशत, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम आणि आवश्यक खबरदारी यावर भाष्य करणार आहे. सध्या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. त्यातच मेंदीच्या कार्यक्रमादरम्यान गावात बिबट्या दिसल्याने भीतीचं वातावरण निर्माण होतं. याआधीही आयुष्यात अनेक संकटांना सामोरं गेलेले राया - मंजिरी आता या नव्या आव्हानातून कसे मार्ग काढणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

मालिकेतल्या नव्या ट्रॅकबद्दल बोलताना अभिनेता विशाल म्हणाला, महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांत अनेकांनी प्राण गमावल्याचे ऐकले की अंगावर काटा येतो. मालिकेतही याच वास्तवाचं प्रतिबिंब पडणार आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, वनविभागाच्या कोणत्या सूचना पाळाव्यात यावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवा, एकटे जाणं टाळा, घराबाहेरील परिसर प्रकाशात ठेवा, मुलांना एकटे सोडू नका अशा अनेक गोष्टी मालिकेतून मांडल्या जातील.” या प्रसंगाचं साकारताना मोठी जबाबदारी असल्याचंही त्याने सांगितलं.

तर मंजिरीची भूमिका साकारणारी पूजा बिरारी म्हणाली, बिबट्यांचे वाढते हल्ले, त्यामागची कारणं आणि बचावाचे उपाय या विषयाला मालिकेतून हाताळणं ही अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे. मानववस्तीतील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्ही परिस्थितीचं गांभीर्य जपत काम करणार आहोत.