काळजाचा ठोका चुकवणारा 'हा' थ्रिलर चित्रपट पाहिलात का..?

काळजाचा ठोका चुकवणारा 'हा' थ्रिलर चित्रपट पाहिलात का..?

मुंबई - कधी कधी एखादा सिनेमा पाहिल्यानंतर दिवसन्‌दिवस त्याचे विचार मनात रेंगाळत राहतात. त्यातील काही प्रसंग इतके तीव्र असतात की, जणू कोणी आपला पाठलाग करत आहे, अंधारात काहीतरी दबा धरून बसलंय आणि ते आपल्याकडे पाहतंय असं सतत जाणवत राहतं. अशाच भावना निर्माण करणारा सुपरहिट तमिळ सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘रत्सासन’ अनेक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणून गेला होता. आता त्याचाच तेलुगू रिमेक ‘राक्षसुदु’ पुन्हा एकदा वेगळ्या शैलीत तीच दहशत निर्माण करतो.

‘राक्षसुदु’ ची कथा सर्वसामान्य जीवनाभोवती फिरते. अरुण नावाचा तरुण चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न बाळगतो. तो क्राईम थ्रिलर सिनेमांचा सखोल अभ्यास करत असतो, पण वडिलांच्या मृत्यूनंतर तो हे स्वप्न सोडून पोलिस सेवेत दाखल होतो. पहिल्याच पोस्टिंगमध्ये त्याला एका भयानक सिरीयल किलरचा सामना करावा लागतो. हा खुनी निर्दोष शाळकरी मुलींना लक्ष्य करतो आणि प्रत्येक वेळी पोलिसांना चकवण्यात यशस्वी ठरतो.

अरुण मग आपल्या जुन्या छंदाचा वापर तपासात करू लागतो. थ्रिलर सिनेमांमधून तो सिरीयल किलर्सच्या मनोवृत्तीचा अभ्यास करतो आणि खुन्याच्या मानसिकतेत डोकावण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक टप्प्यावर सस्पेन्स वाढत जातो. अनेकदा वाटतं, ‘आता तर तो पकडला’, पण कथानक धक्कादायक वळण घेते. शेवटची 30 मिनिटं तर अंगावर काटा आणणाऱ्या सस्पेन्सने भरलेली आहेत.

साई श्रीनिवासने साकारलेला अरुण प्रभावी ठरतो. भीती, राग आणि धैर्य यांचा उत्तम मिलाफ त्याच्या अभिनयातून दिसून येतो. अनुपमा परमेश्वरनने त्याच्या प्रेयसीची भूमिका भावनिक खोलीने निभावली आहे. सहाय्यक कलाकारांचाही अभिनय विशेष उल्लेखनीय, विशेषतः खलनायकाचा—त्याचा उलगडा होताच अंग शहारा येतो. फक्त 2 तास 2 मिनिटांच्या या चित्रपटात प्रत्येक क्षणी नवं वळण आहे. 7.9 IMDb रेटिंग मिळालेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने उत्कृष्ट सायकॉलॉजिकल थ्रिलर ठरतो. तुम्हाला सायकॉलॉजिकल थ्रिलर्सची आवड असेल, तर ‘राक्षसुदु’ नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट आहे.