'या' भारतीय खेळाडूने अचानक ठोकला बॅडमिंटनला रामराम
पुणे - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एलीट पातळीवरील खेळासाठी शरीर आता साथ देत नसल्याने हा निर्णय घेतल्याचं सायनाने स्पष्ट केलं आहे. लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाने आपला अखेरचा सामना २०२३ सिंगापूर ओपनमध्ये खेळला होता. एका पॉडकास्टमध्ये सायनाने सांगितलं, मी दोन वर्षांपूर्वीच खेळणं थांबवलं होतं. स्वतः च्या अटींवर खेळायचं आणि त्याच अटींवर निवृत्त व्हायचं, असा माझा विचार होता. त्यामुळे अधिकृत घोषणा करणं गरजेचं वाटलं नव्हतं. आता खेळता येत नसेल, तर ते स्वीकारायला हवं.

रियो ऑलिम्पिक २०१६ दरम्यान सायनाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्या कारकिर्दीवर त्याचा मोठा परिणाम झाला. २०१७ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने दमदार पुनरागमन केलं, मात्र गुडघ्यांच्या सततच्या समस्यांमुळे तिची वाटचाल अडथळ्यांत अडकली. २०२४ मध्ये सायनाने गुडघ्यांना आर्थरायटिस असल्याचं आणि कार्टिलेज पूर्णपणे घासल्याचं उघड केलं होतं. त्यामुळे सर्वोच्च स्तरावर खेळणं जवळपास अशक्य झालं.
सायना नेहवाल ही २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली. एप्रिल २०१५ मध्ये जागतिक क्रमवारीत नंबर वन बनणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१५ मध्ये रौप्य, २०१७ मध्ये कांस्यपदक, तसेच २०१० दिल्ली आणि २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या एकेरीत सुवर्णपदक तिच्या नावावर आहे. बीडब्ल्यूएफ सुपर सिरीजमधील इंडोनेशिया ओपन, हाँगकाँग ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धाही तिने जिंकल्या. २००८ मध्ये जागतिक ज्युनियर अजिंक्यपद जिंकून तिने इतिहास रचला. खेलरत्न (२००९), पद्मश्री (२०१०) आणि पद्मभूषण (२०१६) या सर्वोच्च सन्मानांनी तिला गौरवण्यात आलं आहे.
दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातही सायनाच्या बाबतीत मोठी घडामोड समोर आली आहे. बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप यांच्याशी सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली सायना आता विभक्त होत असल्याचं तिने जाहीर केलं आहे. हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीतून सुरू झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. १४ डिसेंबर २०१८ रोजी दोघांनी विवाह केला होता. मात्र लग्नाला सात वर्ष पूर्ण होण्याआधीच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.




