भोगावती साखर कारखान्याची विस्तारवाढ, को - जनरेशन अन् डिस्टिलरी करूनच स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार - मंत्री हसन मुश्रीफ

भोगावती साखर कारखान्याची विस्तारवाढ, को - जनरेशन अन्  डिस्टिलरी करूनच स्वर्गीय  पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार - मंत्री हसन मुश्रीफ

करवीर (प्रतिनिधी) - स्वर्गीय आ. पी.  एन.  पाटील यांना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर म्हणून भोगावती साखर कारखान्या बद्दल प्रचंड आत्मीयता होती या भोगावती साखर कारखान्याची पाच हजार गाळपक्षमतेसह विस्तारवाढ, को- जनरेशन प्रकल्प आणि डिस्टिलरी प्रकल्प करूनच कै. पी.  एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार आहोत, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कुरुकली ता. करवीर येथे निगवे खालसा जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार संदीप पाटील, निगवे खालसा पंचायत समितीचे मतदार संघाचे उमेदवार पांडुरंग पाटील, परिते पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार साताप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते.

    

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय आ. कै. पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटील यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. ही सल आजही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये टोचत आहे  या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून राहुल पाटील यांचा झालेला पराभव भरून काढूया. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील - सडोलीकर म्हणाले, स्वर्गीय आ. कै. पी एन पाटील यांच्या निधनानंतर आमच्या गटांने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या पहिल्याच निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. पी. एन. पाटील यांच्या जाण्यानंतर जनता आम्हा कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तसेच;  मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विश्वासाचा हात आम्हा सर्वांच्या पाठीवर ठेवला. 

वडीलकीच्या नात्याने पाठीशी......! 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, माझी आणि स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटील यांची चांगली मैत्री होती. काही मुद्द्यांवर आमच्यात मतभेदही असायचे त्यांच्या अचानक जाण्याने हा गट पोरका झाला आहे. परंतु; तुम्हा सर्वांना वडीलकीच्या नात्याने कधीही पोरकेपणाची जाणीव होऊ देणार नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

स्वर्गीय पी. एन.  पाटील यांना श्रध्दांजली.....!

राहुल पाटील म्हणाले, २०१५ साली स्वर्गीय आ. कै. पी. एन.  पाटीलसाहेब यांनी या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी पक्षाचा ए. बी.  फॉर्म संदीप पाटील यांना दिला होता.  परंतु; त्यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी नम्रतेने तो फॉर्म त्यांच्याकडे परत केला आणि माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला.  संदीप पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांच्या विजयाने पी. ए. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करूया.....!

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, सरपंच रोहित पाटील, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पाटील, केरबा भाऊ पाटील, दत्तात्रय मुळीक,  डॉ. दिग्विजय पाटील, शिवाजी कारंडे, दत्तात्रय मुळीक, संतोष पोर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.