माजी जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

माजी जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

कागल (प्रतिनिधी) - कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती शिवानी भोसले यांनी आज मंडलिक गटातून बाहेर पडत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे, समरजितसिंह घाटगे यांनो भाजपात त्यांचे स्वागत केले. पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिला. आता त्या नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघात राजे गटाच्या उमेदवार राहणार असून त्यांच्या या प्रवेशामुळे मंडलिक गटाला मोठा धक्का बसला आहे. 

2017 साली झालेल्या नानीबाई चिखली जिल्हा परिषद निवडणुकीत शिवानी भोसले या मंडलिक गटाच्या उमेदवार होत्या. त्यावेळी कागल तालुक्यात मंडलिक गटाच्या एकमेव विजयी उमेदवार म्हणून त्या राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पदावर संधी देखील मिळालेली होती. 

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी मंडलिक गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या गटात प्रवेश केला. नानीबाई चिखली हा जिल्हा परिषद मतदारसंघ मंत्री हसन मुश्रीफ, माजी आ. संजय घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या युतीत राजे गटाला गेला आहे. अशावेळी राजे गटात त्यांनी रितसर प्रवेश केल्याने त्यांनी याच गटातून नानीबाई चिखली जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे तसेच राजे गटातून स्वीकारलेल्या उमेदवारीमुळे मंडलिक गटाला मोठा धक्का बसला आहे.