सूर्यकुमार यादवचा यू - टर्न! फलंदाजी क्रमावरून महिन्याभरात बदलले मत
Cricket News - भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा आयसीसी टी - 20 वर्ल्डकप 2026 येत्या 7 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या स्पर्धेतून पुन्हा एकदा टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दीड वर्षांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वविजेतेपद पटकावले होते. यंदा मात्र कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे असून, विजेतेपदाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. दरम्यान, विश्वचषकाच्या तोंडावर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम अद्यापही निश्चित झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अवघ्या एका महिन्यात आपल्या विधानावरून यू - टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी - 20 मालिकेबाबत माहिती दिली. प्लेइंग इलेव्हनविषयी बोलताना त्याने जखमी तिलक वर्माच्या जागी इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या फलंदाजी क्रमाबाबत बोलताना सूर्यकुमारने तिसऱ्या ऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा संकेत दिला. माझे आकडे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चांगले आहेत, मात्र चौथ्या क्रमांकावर थोडे अधिक चांगले आहेत. संघाला फ्लेक्सिबल ठेवायचे आहे. उजव्या हाताचा फलंदाज बाद झाला तर मी येईन, अन्यथा डावखुरा फलंदाज संधी घेईल,असे सूर्यकुमार म्हणाला.
https://www.instagram.com/reel/DTvCxeBAXmf/?utm_source=ig_web_copy_link
विशेष म्हणजे, अवघ्या महिन्याभरापूर्वी लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनबाबत सूर्यकुमार यादवने वेगळे मत व्यक्त केले होते. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन आता ओव्हररेटेड वाटते, असे त्याचे विधान होते. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या संघात समावेशानंतर हा कॉम्बिनेशन सातत्याने वापरण्यात येत आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी टी - 20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करताना सूर्यकुमार यादवने तिलक वर्मा तिसऱ्या आणि स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता पुन्हा एकदा या भूमिकेत बदल दिसून येत असून, विश्वचषकाआधी भारतीय संघातील प्रयोग सुरूच असल्याचे चित्र आहे.




