एआय प्रोमोमुळे चर्चेत नवी मराठी मालिका ; सचिन पिळगावकरांच्या 'या' चित्रपटाची कॉपी असल्याचा प्रेक्षकांचा आरोप
मुंबई - मराठी मनोरंजनविश्वात छोट्या पडद्यावर अनेक बदल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत, तर काही नव्या कथांनी हळूहळू उत्सुकता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अशाच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीवरील एका नव्या मालिकेची घोषणा झाली असून, पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र हा प्रोमो समोर येताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ही आगामी मालिका लवकरच स्टार प्रवाहवर प्रसारित होणार असून, ‘बाई तुझा आशिर्वाद’ असे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा पहिला प्रोमो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून, तो पाहताच कथानकाचा साधारण अंदाज प्रेक्षकांना येतो. मात्र अनेक प्रेक्षकांनी हा प्रोमो पाहून अभिनेते सचिन पिळगावकर यांचा गाजलेला ‘आम्ही सातपुते’ चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप केला आहे.

प्रोमोमध्ये नवरी गृहप्रवेशासाठी पाठमोरी उभी असल्याचे दाखवण्यात आले आहे. आनंदाने ती नव्या घरात पाऊल ठेवण्यास सज्ज असते. नवरा घराचं कौतुक करत सांगतो, “आमचं घर सुंदर आहे, मायेने भरलेलं आहे. आमच्यासाठी हे घर नाही, मंदिर आहे. आमच्या चारही भावांच्या घरात तुझं स्वागत आहे.” मात्र दार उघडताच घराचं खरं रूप तिच्यासमोर येतं. अस्ताव्यस्त कपडे, किचनमध्ये भांड्यांचा पसारा, फॅनवर अडकलेला कपडा आणि सर्वत्र घाण. हे पाहताच नवरी पदर खोचून कामाला लागते. ‘घराला घरपण बाईमुळेच येतं’ ही टॅगलाईन या मालिकेचा मुख्य मुद्दा मांडते. हा प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी ही कथा ‘आम्ही सातपुते’ सिनेमाची कॉपी असल्याचा आरोप केला आहे.
https://www.instagram.com/reel/DTk0dOlk-d8/?utm_source=ig_web_copy_link
“सातपुतेमधले भाऊ कमी केले वाटतं,” “तीच तीच कन्सेप्ट पुन्हा रिपीट,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर काहींनी टॅगलाईनवरही नाराजी व्यक्त केली आहे. “बायको नव्हे तर कामवाली बाई हवी आहे,” “पुन्हा बाईलाच कामवाली बनवलं,” अशा तिखट कमेंट्स करत प्रेक्षकांनी मालिकेच्या संकल्पनेवर टीका केली आहे.
एकूणच अलीकडच्या काळात प्रेक्षक मालिकांच्या कथानकांबाबत अधिक जागरूक आणि रोखठोक भूमिका घेताना दिसत आहेत. सासू - सून कारस्थानं, लग्नाच्या नावाखाली किंवा आदर्श स्त्रीच्या प्रतिमेआड बाईवर होणारा अन्याय दाखवणाऱ्या कथांना प्रेक्षक खुलेपणाने ट्रोल करत आहेत. काही दिवसांपूर्वी सण मराठी वाहिनीवरील एका मालिकेलाही अशाच तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ‘बाई तुझा आशिर्वाद’ ही मालिका प्रेक्षकांची नाराजी दूर करू शकते का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.




