‘बॉर्डर 2’ मधील बहुप्रतिक्षित ‘घर कब आओगे’ गाणे रिलीज

‘बॉर्डर 2’ मधील बहुप्रतिक्षित ‘घर कब आओगे’ गाणे रिलीज

मुंबई - सनी देओलच्या आगामी चित्रपट ‘बॉर्डर 2’ मधील पहिले गाणे ‘घर कब आओगे’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते आणि आज त्यांची प्रतिक्षा संपली आहे. सध्या या गाण्याचे केवळ ऑडिओ व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले असून, त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी रिलीज केला जाणार आहे. हे गाणे विविध ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.

मूळ ‘बॉर्डर’ चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. विशेषतः त्यातील देशभक्तीपर गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे ‘बॉर्डर 2’ कसा असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. ‘घर कब आओगे’ हे गाणे रिलीज झाल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘घर कब आओगे’ हे गाणे ‘बॉर्डर’ मधील अजरामर गीत ‘संदेसे आते हैं’ चे री-क्रिएटेड व्हर्जन आहे. त्याच धूनवर, नव्या शब्दांत आणि आधुनिक सादरीकरणात हे गाणे मांडण्यात आले आहे. मूळ गाण्याचे गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले होते आणि संगीत अनु मलिक यांचे होते. नव्या व्हर्जनसाठी गीतलेखन मनोज मुंतशिर यांनी केले असून, संगीतकार मिथुन आहेत.

विशेष म्हणजे, यावेळी हे गाणे चार लोकप्रिय गायकांच्या आवाजात सादर करण्यात आले आहे. सोनू निगम, अरिजीत सिंह, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांनी या गाण्याला आवाज दिला असून, या अनोख्या संयोजनामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच मोना सिंह, सोनम बाजवा, आन्या सिंह आणि मेधा राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.