अजितदादांना श्रद्धांजली,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव

अजितदादांना श्रद्धांजली,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील विधानभवनात होत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला जाईल. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य हे सभागृहात आपली भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी ते सभागृहात उपस्थित राहणार आहे. या शोक प्रस्तावावेळी उद्धव ठाकरे भाषण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

अजित पवार 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. त्यानंतर झालेल्या स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला होता. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती.