शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवारांचा पूर्णविराम; 'मी काँग्रेसचाच, अफवा पसरवू नका'
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांवर अखेर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्ष बदलण्याचा कोणताही प्रश्नच नसल्याचे ठामपणे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून विजय वडेट्टीवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या सर्व बातम्यांना त्यांनी फेटाळून लावत, महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की मुद्दाम अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला.वडेट्टीवार म्हणाले, "मी काँग्रेसच्या विचारांशी बांधील आहे. पद किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेसारख्या गंभीर प्रश्नांवर सरकारने उत्तर द्यावे, त्याऐवजी दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत."
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार हे एकनाथ शिंदे यांचे चांगले मित्र असल्याचे सांगत, त्यांनी शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र पक्षप्रवेशाबाबत वडेट्टीवार यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.यामुळे शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच पूर्णविराम देत, बदनामीचे आणि अफवांचे राजकारण थांबवण्याचे आवाहन केले आहे.




