नाशिक विधानपरिषद निकालाचा 'सीक्रेट' 4 दिवस आधीच शिंदेंना माहीत होता?

नाशिक विधानपरिषद निकालाचा 'सीक्रेट' 4 दिवस आधीच शिंदेंना माहीत होता?

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता एक मोठा राजकीय दावा समोर आला आहे. अपक्ष आमदार गोकुळ गीते यांनी असा दावा केला आहे की, नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल एकनाथ शिंदे यांना तब्बल चार दिवस आधीच माहीत होता.

माध्यमांशी बोलताना गोकुळ गीते म्हणाले की, मतदान झाल्यानंतरच मतदारांचा कल काय आहे याची माहिती शिंदे यांना मिळाली होती. नाशिकमधून अनेक लोकांनी त्यांना फोन करून महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयी होत नसल्याची माहिती दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिंदे यांची भेट घेतली असता, शिंदेंनी मोठ्या मनाने त्यांचे स्वागत केले आणि पाठीवर शाबासकीची थाप दिल्याचेही गीते यांनी सांगितले.

याशिवाय गोकुळ गीते यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. मतदानानंतर त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची गुप्त भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, "मी 100 पेक्षा जास्त मतांनी जिंकलो तर मला स्वीकारा, अन्यथा सहा वर्षे अपक्ष म्हणून काम करेन," असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.गीते यांच्या मते, निकालाच्या आदल्या दिवशी श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती एकनाथ शिंदेंना दिली होती. त्यामुळे निकाल लागल्यानंतर शिंदेंना विशेष आनंद झाला, कारण गीते यांनी दिलेला शब्द खरा ठरल्याचे त्यांनी मान्य केले.

इतकेच नाही, तर सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नातही श्रीकांत शिंदे आणि आपली भेट झाली होती, असा दावाही गोकुळ गीते यांनी केला आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून आपण शिवसेनेचे सहयोगी आमदार झालो असून, योग्य वेळी एकनाथ शिंदे सांगतील तेव्हा शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, गोकुळ गीते यांच्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या दाव्यांवर शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.