प्रियांका गांधींच्या एका वक्तव्याने संसदेत खळबळ! प्रल्हाद जोशींबाबत नेमका वाद काय?
मुंबई (प्रतिनिधी) : पेपरफुटी दुरुस्ती विधेयकावर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला. शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका करताना त्यांनी, बलात्काराच्या आरोपींच्या सुटकेचं समर्थन करणारी व्यक्ती आज देशाची शिक्षणमंत्री आहे, असा आरोप केला. या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहात गदारोळ केला आणि प्रियांका गांधींकडे त्यांच्या आरोपांचा पुरावा मागितला.

प्रियांका गांधी यांनी केलेला हा उल्लेख 2022 मधील बिलकिस बानो प्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. गुजरात दंगलीदरम्यान बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषींना शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच कारागृहातून मुक्त करण्यात आल्यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता.
त्यावेळी प्रल्हाद जोशी यांनी, चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी कैद्यांची सुटका करण्याची कायदेशीर तरतूद असल्याचं सांगत, हा निर्णय कायद्याच्या चौकटीत झाल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेतल्याचं सांगत त्यात काही गैर वाटत नसल्याचंही म्हटलं होतं.
याच जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत प्रियांका गांधी यांनी संसदेत प्रल्हाद जोशींवर निशाणा साधला. त्यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा बिलकिस बानो प्रकरण आणि त्या काळातील राजकीय भूमिका चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.




