दयाळूपणाच्या नावाखाली धोका ; वन्यप्राण्यांना मानवी अन्न देणे ठरते जीवघेणे

दयाळूपणाच्या नावाखाली धोका ; वन्यप्राण्यांना मानवी अन्न देणे ठरते जीवघेणे

मुंबई - निसर्गप्रेम आणि वन्यजीवांविषयी कुतूहल प्रत्येकालाच असते. मात्र, अलीकडच्या काळात जंगलभ्रमंती किंवा प्राणीसंग्रहालयात फिरताना प्राण्यांना मानवी खाद्यपदार्थ खाऊ घालण्याचा वाढता ‘ट्रेंड’ वन्यजीवांसाठी गंभीर धोक्याचा विषय बनला आहे. वेफर्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, फ्रेंच फ्राइज, रोटी यांसारखे पदार्थ आता हरीण, माकड, अस्वल आणि पक्ष्यांच्या तोंडात सहज दिसतात. पर्यटन स्थळांवर, गडकिल्ल्यांवर किंवा जंगलभ्रमंतीदरम्यान माणसे अशा प्राण्यांना ‘प्रेमाने’ हे पदार्थ देतात, पण प्रत्यक्षात ही दयाळूपणाची नव्हे तर अज्ञानाची आणि अविचाराची कृती आहे.

वन्य प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात जे खातात, ते त्यांच्या शरीर रचनेस अनुरूप असते. त्यांच्या आहारात मीठ, तेल, मसाले किंवा साखर नसते. मात्र, मानवी जंकफूड खाल्ल्याने त्यांना पचनविकार, स्थूलत्व, त्वचारोग तसेच यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार होतात. या अन्नामुळे त्यांचे आरोग्यच नाही तर नैसर्गिक वर्तन, अन्नशोध आणि शिकारीची प्रवृत्तीही कमी होते. परिणामी, परिसंस्थेचे संतुलन धोक्यात येते.  या वाढत्या समस्येकडे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले असून अनेक ठिकाणी ‘प्राण्यांना खाऊ घालू नका’ अशा सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्हीद्वारे पर्यटकांवर लक्ष ठेवले जात आहे.

पर्यटकांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, वन्यजीवांकडे पाहताना आपण पाहुणे आहोत, मालक नव्हे. प्राण्यांना मानवी अन्न देऊन आपण त्यांना आनंद देत नाही, तर त्यांच्या आयुष्याशी खेळत आहोत. निसर्गाचा सन्मान म्हणजे त्यात हस्तक्षेप न करणे. जेव्हा प्राण्यांना सहजपणे आयते अन्न मिळते, तेव्हा त्यांची नैसर्गिक अन्नशोध क्षमता कमी होते आणि ते मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता वाढते. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार कोणत्याही वन्य प्राण्याला अन्न देणे, त्रास देणे किंवा त्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप करणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा कृतींसाठी दंड आणि तुरुंगवास, दोन्ही शिक्षा होऊ शकतात.