उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आमदारांना 'हे' स्पष्ट निर्देश
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्रपणे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पक्षनेते अजित पवार यांनी सर्व आमदारांना “मुंबईत थांबू नका, आपल्या मतदारसंघात परत जा आणि निवडणुकीची तयारी सुरू करा.” अशा शब्दात कडक सूचना दिल्या आहेत.

मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी म्हटले, “स्थानिक स्वराज्य निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. कोणाच्या भरोशावर राहू नका, पक्षाचे बळ वाढवण्यासाठी स्वतः मैदानात उतरा.” पक्षाच्या नियमित मंगळवारच्या बैठकीत त्यांनी तयारी, संघटनबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या सक्रियतेवर भर दिला.
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या पाहणीदरम्यान त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. वारजेतील चौधरी चौकातून दौऱ्याची सुरुवात करताना पवार यांनी वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी आणि विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या.
धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील पाहणीत त्यांनी वारजे, शिवणे पुलाच्या उंचीचा मुद्दा उपस्थित केला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाची उंची वाढवण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. तसेच धायरी डीपी रोड व कात्रज चौक उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, पीएमआरडीएचा एक अधिकारी वेळेवर न आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले. “वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही?” असा सवाल करत त्यांनी त्या अधिकाऱ्यांना सर्वांसमोर फटकारले.




