घरफाळा वसुली वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा- आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

घरफाळा वसुली वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा- आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिकेच्या घरफाळा विभागाने चालू आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्काळ वसुली वाढविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रारंभी कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी स्लाईड शोद्वारे घरफाळा विभागाची माहिती दिली. यामध्ये चालू मागणीवरील 6 टक्के सवलत योजनेतून आजअखेर 9 कोटी रुपयांची वसुली झाली असून, 30 जुलै 2026 अखेर 30 कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

  यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी घरफाळा विभागातील चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वतः आढावा घेणार असल्याचे सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याने वसुली वाढीसाठी प्रयत्न करावेत नवीन मिळकतींचा शोध घेऊन उत्पन्न वाढवावे तसेच 6 टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी व्यापक जनजागृती करावी असे निर्देश दिले.

थकबाकीमधील दुबार नोंदींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याच्या सूचना देऊन थकीत 73 कोटी 77 लाख रुपयांपैकी किमान 20 ते 25 कोटी रुपयांची वसुली यावर्षी झाली पाहिजे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, शासकीय थकबाकी तसेच मोबाईल टॉवर थकबाकीबाबत अधिक्षक, कर निर्धारक व संग्राहक आणि सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ पाठपुरावा करावा अशा सूचनाही दिल्या. ज्या शासकीय इमारतींना अद्याप घरफाळा आकारलेला नाही, अशा सर्व मिळकतींना कर आकारणी करावी. तसेच मोठ्या शासकीय व व्यावसायिक थकबाकीदारांची ‘टॉप 10’ यादी तयार करून वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नव्याने शोधलेल्या 6 हजार मिळकतींना अंतिम 7 दिवसांची नोटीस देऊन कर आकारणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सहाय्यक आयुक्तांनी वेळोवेळी विभागीय कार्यालय स्तरावर वसुलीबाबत बैठका घ्याव्यात तसेच थकीत व्यावसायिक मिळकती सील करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.

       यावेळी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, जयंत जावडेकर, विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, अधिक्षक अशोक यादव, दत्तप्रसाद माजगांवकर, अर्चना प्रभावळे तसेच वसुली लिपीक उपस्थित होते.