खा.धनंजय महाडिकांवरील कमेंट्स मुळे,पंढरपुरातील सुस्ते येथे कार्यकर्त्यानमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

खा.धनंजय महाडिकांवरील कमेंट्स मुळे,पंढरपुरातील सुस्ते येथे कार्यकर्त्यानमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

सोलापूर (प्रतिनिधी) : नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात झालेल्या राड्याची घटना ताजी असतानाच, आता पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे पुन्हा एकदा दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण हाणामारीमुळे सुस्ते गावात आणि संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, खा.धनंजय महाडिकांवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या कमेंट्स, टीका-टिप्पणी आणि एकमेकांना दाखवल्या जाणाऱ्या टशनमधून हा वाद पेटला.सुस्ते गावात झालेली ही हाणामारी अत्यंत थरारक आणि भयानक होती. या हल्ल्यादरम्यान डोळ्यात मारण्याचा स्प्रे, फायटर आणि शरीराला गंभीर इजा पोहोचवणाऱ्या अत्यंत घातक साधनांचा आणि हत्यारांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

या जीवघेण्या हाणामारीत खा. धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तात्या मामा नागटिळक यांच्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात तात्या मामा नागटिळक यांचा मुलगा आकाश नागटिळक, जावई युवराज चव्हाण, सख्खा भाऊ धनाजी नागटिळक तसेच त्यांचे समर्थक रामदास चव्हाण हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आकाश नागटिळक यांच्या डोळ्यालगत अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खा. धनंजय महाडिक यांच्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादग्रस्त टीका-टिप्पणीमुळे आणि जुन्या राजकीय वैमनस्यातून हा संघर्ष उफाळल्याची चर्चा सध्या सोलापूर आणि पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या प्रकरणात नेमका वाद कोणत्या पोस्टमुळे झाला, हल्ला करणारे नेमके कोण होते आणि त्यांनी कोणत्या विशिष्ट साधनांचा वापर केला, याबाबत पंढरपूर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.