‘३ इडियट्स' मधील रँचो सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही ; आमिर खानचा मोठा खुलासा, उपोषणाबाबत व्यक्त केली काळजी
पुणे/मुंबई: प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) समर्थनार्थ त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. गेल्या २० दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असून, यात आता सुपरस्टार आमिर खाननेही त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, '३ इडियट्स' सिनेमातील आपल्या पात्राबाबतचा एक मोठा गैरसमजही दूर केला आहे.

'रँचो आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही...'
'३ इडियट्स' चित्रपटातील आमिर खानने साकारलेले 'फुंसुक वांगडू' उर्फ 'रँचो' हे लोकप्रिय पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे, असा समज प्रेक्षकांमध्ये आहे. नुकतीच 'ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट'ला भेट दिली असताना आमिरला यावर प्रश्न विचारण्यात आला.
याचा खुलासा करताना आमिर म्हणाला, "हा एक मोठा गैरसमज आहे. आम्ही जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. नुकताच मी 'चतुर'ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये त्याने रँचोचा उल्लेख केला आहे. पण चतुरचा देखील गैरसमज झाला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी किंवा माझ्यापैकी कोणालाही चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सोनम वांगचुक यांच्याबद्दल कल्पना नव्हती."
कामाचा आदर आणि आरोग्याची काळजी
३ इडियट्स मधील पात्र त्यांच्यावर आधारित नसले तरी सोनम वांगचुक करत असलेल्या कामाबद्दल आमिरने प्रचंड आदर व्यक्त केला. तो म्हणाला, "सोनम वांगचुक जे काम करत आहेत, ते अतिशय उत्कृष्ट आणि कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी चित्रपटातील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची काहीच गरज नाही. खुद्द सोनम यांनीही यापूर्वी हे स्पष्ट केले आहे की चित्रपटातील पात्र त्यांच्यावर बेतलेले नव्हते. मला केवळ वस्तुस्थिती समोर आणायची होती."
वांगचुक यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीवर चिंता व्यक्त करत आमिर पुढे म्हणाला, "आम्हा सर्वांनाच त्यांच्या जीवाची आणि आरोग्याची काळजी वाटत आहे. हे आंदोलन लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने संपेल आणि सोनम वांगचुक आपले उपोषण मागे घेऊन स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतील, अशी मी आशा करतो."




