नंदुरबारमध्ये अचानक वीज कोसळल्याने २६ मेंढ्यांचा जागीच मृत्यू

धुळे - नंदुरबार जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. विशेषतः नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारात वीज कोसळून मेंढ्यांच्या कळपात २६ मेंढ्या ठार झाल्या आहेत. तहसील कार्यालयाने या घटनेचा पंचनामा केला असून, पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. शेतकरी समाधानकारक पावसाची वाट पाहत होते. अखेर बुधवारपासून जिल्ह्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने आगमन केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि खरीप पेरण्यांना गती मिळू लागली आहे.
या पावसामुळे नंदुरबार शहरासह तालोदा, शहादा, नवापूर, अक्कलकुवा भागांतही मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली असून, पाताळगंगा नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.