हिमाचलमध्येही ढगफुटीचा कहर 'या' पाच ठिकाणाचं झालं मोठं नुकसान

शिमला - मागील आठवड्यात उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे ढगफुटीमुळे मोठी हानी झाली होती. अनेक घरे आणि नागरिक पाण्यात वाहून गेले असून, तेथील परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. ही घटना ताजी असतानाच आता हिमाचल प्रदेशातील पाच ठिकाणी ढगफुटीची नोंद झाली आहे. नंथी, किन्नौर, पहू, मयाड आणि कुल्लूतील तीर्थन व्हॅली या भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
या ढगफुटीमुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचलमधील अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील दोन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ३२३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय ७० वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले असून, १३० पिण्याच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत. अनेक भागांमध्ये वीज गेली आहे आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. तीन मोठे पूलही वाहून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही भागांत तर घरांमध्येच पुराचं पाणी शिरल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
हिमाचलमध्ये २० जूनपासून १२ ऑगस्टपर्यंत या पावसाळी हंगामात २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३२६ जण जखमी झाले आहेत. रस्ते अपघातातही ११५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूर, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे २,००० हून अधिक घरे प्रभावित झाली असून, एकूण आर्थिक नुकसानीचा अंदाज सुमारे २०३१ कोटी रुपये इतका आहे.