मुख्यमंत्री फडणवीसांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं भाष्य

मुख्यमंत्री फडणवीसांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं भाष्य

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१० फेब्रुवारी) सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दावे-प्रतिदावे करत आहेत.

आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“मला विश्वास आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात अगदी कालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील त्यांना चांगलं यश मिळालं आणि भविष्यात देखील त्यांचा पक्ष चांगलं काम करेल. बाकी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे जे विषय आहेत, ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत. त्या विषयाबाबत मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा पक्ष त्याबाबत योग्य ते बोलेल. पण आज ती वेळ आलेली नाही. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ते आम्हाला अधिकृतरित्या सांगतील की आमचं काही ठरलं आहे, तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे?”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.