महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी 'फडणवीसांचा कार्यकाळ पूर्ण, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत दावे केले जात असतानाच, आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदासाठी थेट मागणी करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची वेळ आली असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे केले आहे.
मोरे यांच्या मते, महायुतीमध्ये आधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचाही कार्यकाळ पूर्णत्वाकडे जात असल्याने उर्वरित काळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत महायुतीने राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद द्यावे आणि सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी.
महायुतीने यापूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही समान संधी मिळावी, अशी भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अंतिम निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडेच असल्याचे त्यांनी नमूद केले.आता डॉ. अभिजित मोरे यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला नवे वळण मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




