पाच नद्यांच्या संगमावर पाण्याचे तांडव ! पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, ५१ बंधारे पाण्याखाली

पाच नद्यांच्या संगमावर पाण्याचे तांडव ! पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, ५१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून धरणक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून ती ३३ फूट ५ इंचांवर पोहोचली आहे. नदीची आता इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरात पूरस्थितीची शक्यता:
 करवीर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या प्रयाग चिखली तसेच आंबेवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रयाग संगमाच्या ठिकाणी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती या पाच नद्यांचा संगम होतो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी एकत्र येते. अतिवृष्टी आणि राधानगरीसह अन्य धरणांमधून होणाऱ्या संभाव्य पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगेची पातळी वाढून हे पाणी आसपासच्या शेतात व सखल भागात वेगाने पसरू लागले आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
 परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पूर्वतयारी केली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.