वारीत काळाचा घाला! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक; 3 महिला ठार, अनेक जखमी
मुंबई (प्रतिनिधी) : आषाढी वारीवर आज दुःखाची सावली पसरली आहे. जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांवर भरधाव ट्रक घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वारीसाठी शिधा घेऊन जाणारा ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाने तापाची औषधे घेतल्यानंतर त्याला ग्लानी आल्याने वाहनावरील ताबा सुटल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलिस आणि संबंधित यंत्रणा तपासत असून अधिकृत चौकशीनंतरच सत्य स्पष्ट होणार आहे.
या दुर्घटनेनंतर वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. विविध राजकीय नेत्यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जखमी वारकऱ्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वारीतील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्याची मागणीही करण्यात येत आहे.




