नाथाभाऊंच्या घरवापसीला बळ? मुनगंटीवार म्हणाले - 'खडसेंनी भाजपसाठी जीव ओतून काम केलं

नाथाभाऊंच्या घरवापसीला बळ? मुनगंटीवार म्हणाले - 'खडसेंनी भाजपसाठी जीव ओतून काम केलं

मुंबई (प्रतिनिधी) : नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नागपुरात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, गेल्या ४० वर्षांत भाजप वाढवण्यासाठी अनेक नेत्यांनी योगदान दिले असून त्यामध्ये एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे. पक्षाकडे काहीच नव्हते, त्या काळात खडसे यांनी जीव ओतून काम केले. काही घटनांमुळे ते पक्षाबाहेर गेले, मात्र घरचे लोक पक्षाबाहेर जाणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

खडसेंना पुन्हा भाजपमध्ये घ्यायचे की नाही, याचा अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. ते आणखी अनेक वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहावेत, अशी इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील संघटनात्मक बदल, रखडलेल्या नियुक्त्या आणि पक्ष विस्ताराच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.