विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको! पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज
मुंबई (प्रतिनिधी) : मिरा-भाईंदरमध्ये व्हेज-नॉनव्हेजचा वाद आता थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहोचला आहे. पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, असा मेसेज पालकांना देण्यात आला आहे. मिरारोडमधील सेव्हन स्क्वेअर शाळेने पालकांच्या व्हॉट्सॲप आणि पोर्टल ग्रुपवर हा मेसेज दिल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, असाच मेसेज नायगावमधील सेव्हन स्क्वेअर शाळेच्या पालकांच्या ग्रुपवरही आल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या खासगी शाळेकडून हा मेसेज देण्यात आल्याचं समजतंय.

दरम्यान, या प्रकाराला आता मराठी एकीकरण समिती आणि मनसेनेही विरोध केला आहे. विद्यार्थ्यांनी काय खायचं, हे ठरवणारी शाळा कोण? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. धार्मिक भावना जपण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहारावर होता कामा नये, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली आहे.
पर्यूषण पर्व सुरू असताना मिरा रोड पूर्वेतील सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या पालकांच्या पोर्टल ग्रुपवर एक मेसेज आला. विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना त्यामध्ये विनंती करण्यात आली आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्येही या काळात कांदा, लसूण आणि बटाट्याशिवाय खाद्यपदार्थ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हा मेसेज काही पालकांनी मनसेचे सचिन पोपळे यांना पाठवल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांनी काय खायचं, हे ठरवणारी शाळा कोण? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. धार्मिक भावना जपण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहारावर होता कामा नये, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली आहे.
मात्र, हा वाद आता केवळ मिरा रोडपुरता मर्यादित राहिलेला नाही. वसईतील नायगाव येथील सेव्हन स्क्वेअर शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही अशाच आशयाचा मेसेज आल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्यूषण काळात विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बटाटा आणि इतर कंदमूळ पदार्थ डब्यात आणू नयेत, अशी विनंती या मेसेजमधून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावर आता मराठी एकीकरण समितीनेही आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डब्यात काय असावं आणि काय नसावं, याबाबत धार्मिक आधारावर सूचना करणं योग्य आहे का, असा सवाल समितीकडून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेले भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र सक्तीचे आरोप फेटाळून लावले आहेत. पर्यूषण हा पवित्र काळ असून, या काळात प्राण्यांची कत्तल होऊ नये, या भावनेतून पालकांना केवळ विनंती करण्यात आली असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलं आहे.“आम्ही विनंती केली आहे, कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली नाही,” असं मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात कोणताही वेगळा उद्देश नसून, धार्मिक भावनेच्या विषयाचं राजकारण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
एकीकडे पर्यूषण पर्वाच्या धार्मिक भावना, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आहाराचा आणि पालकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आणि आता मनसेसोबतच मराठी एकीकरण समितीचा विरोध, त्यामुळे मिरा-भाईंदरपासून वसई-नायगावपर्यंत कांदा-बटाट्याचा हा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. मुद्दा कांदा-बटाट्याचा असला, तरी प्रश्न मोठा आहे. शाळा धार्मिक भावना जपण्यासाठी पालकांना विनंती करू शकते का? की विद्यार्थ्यांच्या डब्यात काय असावं, हा पूर्णपणे पालकांचा निर्णय असायला हवा? त्यामुळे कांदा-बटाट्याच्या या मुद्द्याला आता राजकीय फोडणी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.




