देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘प्रसाद ओक म्हणजे..धर्मवीर आनंद दिघे’; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद ओक हात जोडून उभा!
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा 62वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा आणि मान्यवरांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर, मराठी अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला. त्यासोबतच सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सलीम खान पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेलन यांनी त्यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचं अभिनंदन केलं आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठी अभिनेता प्रसाद ओक यांचं तोंडभरून कौतुक केलं. 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक यांनी ‘धर्मवीर’ सिनेमात साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेचंही विशेष कौतुक केलं.
“विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम... निळू फुले म्हणजे अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता, प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे...”असं देवेंद्र फडणवीस म्हणताच अभिनेता प्रसाद ओक उठून उभा राहिला आणि मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून नतमस्तक झाला. प्रसाद ओक यांच्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद ओक, जे दिग्दर्शकही आहेत आणि सुंदर कलावंतही आहेत. मला असं वाटतं की, कलेच्या क्षेत्रात एक प्रकारे 360 डिग्री मॅन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून जे काम करतात, ते खरोखरच विलक्षण आहे. खरंतर विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम... निळू फुले म्हणजे अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे... पण कदाचित पुढच्या वर्षी आम्हाला असं म्हणावं लागेल, प्रसाद ओक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आपल्या भूमिकेत जीव ओतणं, ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी आयुष्यभर प्रसाद ओक यांनी साकारलेली ती प्रतिमा आहे. ती इतकी सुंदर आणि हुबेहुब आहे की, त्यांच्यासाठी तेच धर्मवीर आनंद दिघे राहतील. इतकं सुंदर त्यांनी काम केलंय.
आत्ताच त्यांनी सांगितलं की, 125 सिनेमे त्यांनी केलेत. पण प्रसाद ओक, तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लवकर तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार नाही. अजून खूप पुरस्कार तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीची जी सेवा तुम्ही सातत्याने करत आहात, ती अविरत अशाच पद्धतीने सुरू राहिली पाहिजे.”
“आता ‘देऊळ बंद’ अनेक विक्रम रचतोय, त्यामुळे मराठी माणसाला आनंद वाटतो. ज्यावेळी आपला एक मराठी सिनेमा 100 कोटी आणि वेगवेगळे विक्रम रचतोय, तेव्हा निश्चितच अभिमान वाटतो. तुमच्या संपूर्ण कारकीर्दीला मी मनापासून शुभेच्छा देतो,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, तो लवकरच जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
कलात्मक दृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असं सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत. देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिलं जातं. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही जपली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने पुढे जात आहे.




