आरोग्यदायी कागलसाठी विविध उपक्रम-राजे समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कागलमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उभारण्याचा घेतलेला ध्यास त्यांच्या पश्चात आजही प्रेरणादायी ठरत आहे.त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत “आरोग्यदायी कागल” घडविण्यासाठी राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

ते नानीबाई चिखली ता. कागल येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सुमारे ४७० हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, कागलविधानसभा मतदार संघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार पुढील उपचारही केले जातात.विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्याबाबत अनास्था दिसून येते.अनेकजण आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती ठेवतात, ही बाब धोकादायक असून त्यांनी वेळेत तपासणी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, राजे बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे, संचालिका नम्रता कुलकर्णी, कार्यकारी संचालक अरुण पाटील, विजयसिंह भोसले, सरपंच युवराज कुंभार, वाय. टी. पाटील, बाळकृष्ण काईंगडे, अरुण शिंत्रे, दादासो चिखलीकर तसेच शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत शाहू कृषीचे संचालक राजेंद्र नुल्ले यांनी केले, तर आभार संचालक संजय पाटील यांनी मानले.
कॅन्सरविषयी समाजात भीती व गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. नागरिकांनी या आजाराला घाबरून तो लपवू नये. वेळेत तपासणी करून निदान झाल्यास आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती करून रुग्णांना आवश्यक त्या उपचारांसाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.




