एसटीच्या तोट्यावर सरकारचा कडक बडगा! अधिकाऱ्यांना १ महिन्याची मुदत

एसटीच्या तोट्यावर सरकारचा कडक बडगा! अधिकाऱ्यांना १ महिन्याची मुदत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सततच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देत, पुढील एका महिन्यात उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती किंवा निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केवळ बैठका आणि कागदोपत्री नियोजनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. एसटी ही राज्यातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी असल्याने प्रवाशांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यंदाच्या एप्रिल-मे या उन्हाळी हंगामात भाडेवाढ लागू करण्यात आली होती. सामान्यतः या काळात एसटीच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित असते. मात्र, भाडेवाढीनंतरही महसूल घटल्याबद्दल परिवहन मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील ३१ विभागांपैकी तब्बल २१ विभाग सध्या तोट्यात असल्याने व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आता प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यात येणार आहे. उत्पन्नात घट होण्यामागील कारणे, प्रवासी संख्या कमी होण्याची कारणमीमांसा आणि सेवा व्यवस्थेतील त्रुटींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.एका महिन्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा पुनरावलोकन अहवाल तयार केला जाईल. अपेक्षित सुधारणा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

याशिवाय, बस फेऱ्यांचे प्रभावी नियोजन, वेळेवर गाड्या सोडणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे एसटी प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली असून, येत्या महिनाभरात उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जाण्याची शक्यता आहे.